लंडनच्या प्रतिष्ठित ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे जगप्रसिद्ध ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यात बदलापूरच्या तरुण वन्यजीव छायाचित्रकारने भारताची मान उंचावली आहे. सिताराम दिनकर राऊळ असे या प्रतिभावान फोटोग्राफरचे नाव आहे. त्याने ‘अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन’ या गटाच्या श्रेणीत विजेतेपद पटकावत जागतिक पातळीवर मोठी मजल मारली आहे. विशेष म्हणजे, लंडनमध्ये हा सोहळा सुरू असताना त्याने पुरस्कार स्वीकारताना मराठीतून भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली.
कशी होती ही जागतिक स्पर्धा?
वन्यजीव फोटोग्राफीच्या क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील तब्बल १२१ देशांतून ६५ हजारांहून अधिक छायाचित्रे आली होती. या प्रचंड स्पर्धेतून सितारामच्या फोटोग्राफीची निवड करण्यात आली. राजस्थानच्या जैसलमेर येथील वाळवंटात एका विंचवाने वाळूत खड्डा करून निवारा तयार करताना केलेल्या हालचालीचा टिपलेला अपूर्व क्षणासाठी हा पुरस्कार मिळाला. १३ ऑक्टोबर रोजी लंडन येथे एका दिमाखदार सोहळ्यात सितारामला या जागतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



