कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी खूशखबर आहे. मध्य रेल्वेने वाढत्या गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. 15 नोव्हेंबरपासून 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत. या मार्गावरील 12 डब्यांच्या 18 फेऱ्यांचे रुपांतर आता 15 डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या कायम ठेवून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढेल. या लोकलचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सध्या कसारा मार्गावर प्रामुख्याने 12 डब्याच्या लोकल धावतात. त्यांचे 15 डब्यांच्या लोकलमध्ये रुपांतर झाल्यास प्रवासी क्षमता वाढणार आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात लोकलवरील ताण कमी होईल. मध्य रेल्वेने काही महिन्यांपूर्वी कर्जत, बदलापूर आणि अंबरनाथ मार्गावर देखील 12 डब्यांच्या सेवांचे रुपांतर 15 डब्यांच्या लोकलमध्ये केले आहे. आता कसारा मार्गावर टप्प्याटप्प्याने हा विस्तार करण्यात येईल.


